Saturday 4 November 2017

तुघलक

तुघलक….वेडा कि शहाणा ! मराठी भाषेत पूर्वापार एक वाक्प्रचार वापरला जातो तो म्हणजे “तुघलकी फर्माण”!! तसेच एखाद्या विचित्र किंवा जगावेगळे काम करणाऱ्यास “वेडा महमंद” म्हटलं जाई. ह्या दोन्ही वाकप्रचारांचा मागोवा घेतला तर हि कथा पोहोचते दिल्लीच्या सुलतान महंमद बिन तुघलकापर्यंत. हे महाशय जेवढे कठोर तितकेच कल्पक होते. एकदा त्याच्या मनात आले कि देशाची राजधानी दिल्लीवरून औरंगाबादला (तेव्हाची देवगिरी/दौलताबाद) हलवायची. त्याने फर्माण काढून दिल्लीच्या प्रजेला तिकडे जाण्यास सांगितलं। मोठी हालअपेष्टा सहन करीत दिल्लीवासी औरंगाबादला दाखल झाले परंतु हा निर्णय अंगलट येतोय हे लक्षात आल्यावर पुन्हा घूमजाव करावे लागले. ह्या गोंधळात प्रवासामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले। पुढे तुघलकच्या मनात चीन आणि इराणवर स्वारी करण्याची कल्पना आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती करून त्यांना पुरेसे वेतन दिले. पण दोन्ही उद्दिष्ट्ये पूर्ण होणे दूरच राहिले. अपुरी तयारी आणि ढिसाळ नियोजनामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले. नन्तर अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून सोन्या चांदीच्या नाण्यांवर बंदी आणून तांब्याची नाणी बनवली,पण पुन्हा दुर्दैव आड आले. बनावट टाकसाळींचा सुळसुळाट झाला आणि ह्यावर पर्याय म्हणून तांब्याची नाणी जमा करून सोन देण्याचा प्रयत्न त्याने केला पण त्याचाही अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला ! आज मागे वळून पाहताना मात्र तुघलक दूरदर्शी होता असे म्हणावे लागेल कारण वायव्येकडची सातत्याने होणारी आक्रमणे आणि सर्व भारताच्या विस्ताराचा विचार करता देवगिरी हि मध्यवर्ती राजधानी म्हणून योग्य होती. मंगोल आक्रमकांना पायबंद घालता यावा म्हणून चीनवर स्वारी करून त्यांचे कंबरडे मोडण्याचा त्याचा विचार योग्यच होता. पण हिमालयातील भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान, आवश्यक योग्य दर्जाचे घोडे, पुरेसा अनुभव ह्या सगळ्यांची वानवा असल्याने त्याची त्रेधातिरपिट उडाली. मोठ्या सैन्यदलावर नाहक खर्च करावा लागल्याने जनतेकडून अवास्तव कर वसुली करावी लागली त्यातून पुन्हा अनेक ठिकाणी बंडाळ्या उदभवल्या. आजही चीन आणि पाकिस्तानच्या भौगोलिक सीमा दिल्लीपासून जवळ आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानींपण भोपाळ किंवा हैदराबादला राजधानी करण्याचे सुचविले ते योग्य वाटते. उत्तर व दक्षिण भारतातला सांस्कृतिक व राजकीय भेद हटवून एकसंघपणा येण्यासाठी हा निर्णय योग्यच होता. १९६२ लादेखील चीनचे झालेले आक्रमण पाहता तुघलकचा अंदाज सार्थ होता असेच म्हणता येईल. हीच गोष्ट त्याने केलेल्या नाणीबदलाच्या प्रयोगाबाबतीत म्हणता येईल. पुढे पूर्वापार चालत आलेली सोन्या-चांदीच्या नाण्यांची परंपरा ब्रिटिश आमदणीत येता येता संपुष्टात आली होती. अर्थात ह्या कथाबद्दल अनेक वाद आहेत. हे सगळे निर्णय एका तुघलकाचे नव्हते किंवा त्याचे हेतू वेगळे होते असेही अभ्यासकांचे मत आहे.इतर सुलतानामध्ये असलेले दुर्गुण तुघलकात होतेच तरी देखील काळाच्या पुढे पाहणारी माणसे कधी कधी कशी वेडसर ठरवली जातात ह्याचे तुघलक हे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या चांगल्या निर्णयाला जेव्हा पुरेशा नियोजनाचे पाठबळ नसते तेव्हा जनतेचे कसे हाल होतात हे आपण आजही पाहू शकतो !! तुघलक आजही Relevant आहे ते त्याचमुळे आणि इतिहास अभ्यासायचा असतो तोही त्याचमुळे !!! ……………………..सौरभ रत्नपारखी

No comments:

Post a Comment