Saturday 4 November 2017

तुघलक

तुघलक….वेडा कि शहाणा ! मराठी भाषेत पूर्वापार एक वाक्प्रचार वापरला जातो तो म्हणजे “तुघलकी फर्माण”!! तसेच एखाद्या विचित्र किंवा जगावेगळे काम करणाऱ्यास “वेडा महमंद” म्हटलं जाई. ह्या दोन्ही वाकप्रचारांचा मागोवा घेतला तर हि कथा पोहोचते दिल्लीच्या सुलतान महंमद बिन तुघलकापर्यंत. हे महाशय जेवढे कठोर तितकेच कल्पक होते. एकदा त्याच्या मनात आले कि देशाची राजधानी दिल्लीवरून औरंगाबादला (तेव्हाची देवगिरी/दौलताबाद) हलवायची. त्याने फर्माण काढून दिल्लीच्या प्रजेला तिकडे जाण्यास सांगितलं। मोठी हालअपेष्टा सहन करीत दिल्लीवासी औरंगाबादला दाखल झाले परंतु हा निर्णय अंगलट येतोय हे लक्षात आल्यावर पुन्हा घूमजाव करावे लागले. ह्या गोंधळात प्रवासामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले। पुढे तुघलकच्या मनात चीन आणि इराणवर स्वारी करण्याची कल्पना आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती करून त्यांना पुरेसे वेतन दिले. पण दोन्ही उद्दिष्ट्ये पूर्ण होणे दूरच राहिले. अपुरी तयारी आणि ढिसाळ नियोजनामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले. नन्तर अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून सोन्या चांदीच्या नाण्यांवर बंदी आणून तांब्याची नाणी बनवली,पण पुन्हा दुर्दैव आड आले. बनावट टाकसाळींचा सुळसुळाट झाला आणि ह्यावर पर्याय म्हणून तांब्याची नाणी जमा करून सोन देण्याचा प्रयत्न त्याने केला पण त्याचाही अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला ! आज मागे वळून पाहताना मात्र तुघलक दूरदर्शी होता असे म्हणावे लागेल कारण वायव्येकडची सातत्याने होणारी आक्रमणे आणि सर्व भारताच्या विस्ताराचा विचार करता देवगिरी हि मध्यवर्ती राजधानी म्हणून योग्य होती. मंगोल आक्रमकांना पायबंद घालता यावा म्हणून चीनवर स्वारी करून त्यांचे कंबरडे मोडण्याचा त्याचा विचार योग्यच होता. पण हिमालयातील भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान, आवश्यक योग्य दर्जाचे घोडे, पुरेसा अनुभव ह्या सगळ्यांची वानवा असल्याने त्याची त्रेधातिरपिट उडाली. मोठ्या सैन्यदलावर नाहक खर्च करावा लागल्याने जनतेकडून अवास्तव कर वसुली करावी लागली त्यातून पुन्हा अनेक ठिकाणी बंडाळ्या उदभवल्या. आजही चीन आणि पाकिस्तानच्या भौगोलिक सीमा दिल्लीपासून जवळ आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानींपण भोपाळ किंवा हैदराबादला राजधानी करण्याचे सुचविले ते योग्य वाटते. उत्तर व दक्षिण भारतातला सांस्कृतिक व राजकीय भेद हटवून एकसंघपणा येण्यासाठी हा निर्णय योग्यच होता. १९६२ लादेखील चीनचे झालेले आक्रमण पाहता तुघलकचा अंदाज सार्थ होता असेच म्हणता येईल. हीच गोष्ट त्याने केलेल्या नाणीबदलाच्या प्रयोगाबाबतीत म्हणता येईल. पुढे पूर्वापार चालत आलेली सोन्या-चांदीच्या नाण्यांची परंपरा ब्रिटिश आमदणीत येता येता संपुष्टात आली होती. अर्थात ह्या कथाबद्दल अनेक वाद आहेत. हे सगळे निर्णय एका तुघलकाचे नव्हते किंवा त्याचे हेतू वेगळे होते असेही अभ्यासकांचे मत आहे.इतर सुलतानामध्ये असलेले दुर्गुण तुघलकात होतेच तरी देखील काळाच्या पुढे पाहणारी माणसे कधी कधी कशी वेडसर ठरवली जातात ह्याचे तुघलक हे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या चांगल्या निर्णयाला जेव्हा पुरेशा नियोजनाचे पाठबळ नसते तेव्हा जनतेचे कसे हाल होतात हे आपण आजही पाहू शकतो !! तुघलक आजही Relevant आहे ते त्याचमुळे आणि इतिहास अभ्यासायचा असतो तोही त्याचमुळे !!! ……………………..सौरभ रत्नपारखी

Rang de basanti

रंग दे बसंती राजकुमार संतोषी दिग्दर्शीत ‘दि लिजेंड ऑफ भगतसिंग’ ह्या चित्रपटाच्या सुरुवातीस एक प्रसंग आहे. महात्मा गांधी रेल्वेतून उतरत असतात आणि खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांना जाब विचारतो, कि ‘तुम्हाला शक्य असताना देखील तुम्ही भगतसिंग व त्याच्या सहकारयांची फाशी का थांबवू शकले नाही?” ह्यावर बापू खाली मान घालून निघून जातात, आणि चित्रपटगृहात बसलेल्या सर्व प्रेक्षकांप्रमाणे आपणही त्यांना तिरस्कारपूर्वक नजरेने हेटाळतो. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा इतर कोणत्याही क्रांतिकारकापेक्षा भगतसिंगच्या नावाचे गारुड ह्या पिढीवर फार आहे, इतके कि काही वर्षापूर्वी एकाच वेळी 5 जणांनी भगतसिंगच्या आयुष्यावर चित्रपटाची घोषणा केली। पुढे ‘रंग दे बसंती’ मध्ये भगतसिंग व त्याच्या साथीदारांचा जीवनपट दाखविण्यात आला होता! लहानपणी शेतात बंदुकाची रोपे लावणारा, जालियनवाला बागेच्या हत्याकांडाने हेलावणारा, सँडर्सवर गोळीबार करणारा, असेम्बलीत बॉम्ब फेकणारा, कारागृहात 55 दिवस उपोषणास बसणारा, आणि अखेर ‘जिस चोलेको पहन शिवाजी खेले अपनी जानसे’ असे गीत गात फासावर जाणारा भगतसिंग आपल्याला माहित आहे। पण हाच स्वाभिमानी भगतसिंग गांधींच्या याचनेमुळे सुटलेला एक क्रांतिकारक म्हणून आपण स्वीकारू शकलो असतो का?? स्वतः भगतसिंगाने आपल्या वडिलांना कळविले होते की माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असाल तर तसे करू नका. भगतसिगाला व त्याच्या साथीदारांना वीरमरण हवं होत. स्वतःला नास्तिक म्हणविणारा भगतसिंग कर्मयोगाचे आचरण करणारा होता. म्हणूनच सँडर्स प्रकरण ताजे असताना त्याने स्वतःहून असेम्बलीत बॉम्ब फेकण्याची जबाबदारी उचलली, कारण आपली बाजू जगभरात इंग्लिश मधून पोहोचवायची हि एक नामी संधी त्याला खटल्याच्या रूपाने मिळणार होती व ती जबाबदारी तोच सक्षमपणे पार पाडू शकणार होता. भगतसिंगच्या हौतात्म्यानेच त्याला अमर केले. ‘मरके निकलेगी न वतन कि उल्फत, मेरे मिट्टीसेभी खुशबू, ए वतन आएगी’ ह्या काव्यपंक्ती त्याने सार्थ करून दाखवल्या. आणि देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक कायमस्वरूपी आशावाद रुजवून गेला. म्हणूनच हि पिढी सुद्धा त्याच स्मरण करून म्हणते की “कोई देश परफेकट नही होता, उसे परफेकट बनाना पडता है, हम बनाएंग इसे परफेकट” सौरभ रत्नपारखी

Friday 3 November 2017

What saurabh says Part #2



झी मराठी ह्या वाहिनीबद्दल मला व्यक्तीश: खूप आदर आहे.
आभाळमाया,वादळवाट, सारख्या दर्जेदार मालिका दिल्या.
सुरेल आणि अविट शिर्षकगीते दिली,
अल्फामहाकरंडक सारख्या स्पर्धा झाल्या,
'नक्षत्रांचे देणे'सारखा अनमोल ठेवा दिला,
सारेगमप च्या माध्यमातून नवे व्यासपीठ दिले,
झी गौरवच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना उर्जितावस्था दिली.

पण गेल्या काही दिवसात जसजशी इतर वाहिन्यांची स्पर्धा वाढत चालली आहे तसतशी झीचे सोशल इंजिनियरिंग वाढत चालले आहे.

अर्ध्याअधिक मालिकांची शीर्षके हिंदी-इंग्रजी झाली.
काहे दिया परदेस (अमराठी प्रेक्षक),
तुझ्यात जीव रंगला (पश्चिम महाराष्ट्र), माझ्या नवऱ्याची बायको (विदर्भ),
गाव गाता गजाली (कोकण),
असा आपला प्रेक्षकवर्ग वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत आहेत.
एक व्यावसायिक गरज म्हणून हे योग्यच आहे.
पण महाराष्ट्रात बहूसंख्य असलेला मराठा प्रेक्षकवर्ग लाभावा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचे अवास्तव चित्रण करणारी मालिका झी च्या नावलौकिकाला साजेशी नाही !!  स्टार प्रवाहवरची छत्रपती शिवरायांवरची मालिका सुद्धा ऐतिहासिक होती, पण तोफ उचलून लढाई लढणे किंवा 20 फूट उंच उडी मारून वार करणे, असा अतिरंजित पणा नव्हता.
झीची ही घसरण  पाहून वाईट वाटते !!

Credits : Saurabh Ratnaparakahi